कोकण म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं दृष्य म्हणजे निळाशार समुद्र, त्यातील लाटा, किनारपट्टीवरील वाळू, नारळ सुपारीच्या बागा आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा. सुमारे ७२० कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभलेला हा चिंचोळा प्रदेश समुद्रसपाटीपासून ते सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांपर्यंत वसलेला आहे.
यामध्ये ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. हा सर्व भूभाग डोंगराळ असून सरासरी हवामान उष्ण व दमट आहे. इथे सरासरी ३००० – ३५०० मि. मी. पाऊस पडतो. ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील माती मध्यम काळी असून सुपीकता थोडी जास्त आहे तसेच या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमताही जास्त आहे. तर रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील जमिनी जांभ्या दगडापासून बनलेल्या असून त्या आम्लधर्मीय आहेत व पाणी धरून ठेवण्याची क्षमताही तुलनेने कमी आहे.
अन्नधान्य पिकांमध्ये कोकणात खरीप हंगामात (पावसाळ्यात) भात हे मुख्य पीक घेतले जाते, त्याचबरोबर नाचणी, वरी, कारळा व काही भागात तूर, भुईमूग ही पिके घेतली जातात. रब्बी हंगामात – भात कापणीनंतर – जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर कुळीथ, वाल, चवळी अशी पिके घेतली जातात तसेच भाजीपाला लागवड केली जाते. उन्हाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाजीपाला व काही भागात उन्हाळी भुईमूग अशी पिके घेतली जातात. रायगड जिल्ह्याच्या काही भागात कालव्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे वर्षभरात भाताची २ किंवा ३ पिकेही घेतली जातात. गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यामध्ये आले व हळद आणि थंडी व उन्हाळ्यात कलिंगड या पिकांची लागवडही कोकणात अनेक ठिकाणी होऊ लागली आहे.
इथे होणाऱ्या फळपिकांमध्ये महत्वाचे पीक म्हणजे फळांचा राजा आणि आपल्या सर्वांचा आवडता आंबा. त्याचबरोबर काजू, कोकम, फणस, जांभूळ व करवंद ही वर्षावलंबी फळेही होतात. बागायती पिकांमध्ये नारळ सुपारी, चिकू, केळी व अननस इत्यादींचा समावेश होतो. तर नारळ सुपारीच्या बागांमध्ये लावली जाणारी काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ इत्यादी मसालापिके हे तर कोकणचे खास वैशिष्ठ्य आहे.
समुद्रकिनारी भागांमध्ये मासेमारी हा एक महत्वाचा व्यवसाय आहे. कोकणातील समुद्र किनारे आणि निसर्गासमृद्धतेमुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यटन हा व्यवसायदेखील वाढू लागला आहे. विविध सोई-सुविधा असलेली रिसॉर्ट ते घरगुती
स्वरुपात रहाण्याची सुविधा देणारी MTDC मान्यताप्राप्त ठिकाणे इथल्या अनेक गावांमध्ये आहेत. त्याचबरोबर कृषि पर्यटन, निसर्ग पर्यटन, आरोग्य पर्यटन इ . पर्यटनाचे विविध प्रकारही पाहायला मिळतात.
जमिनीच्या उंचसखलपणामुळे अनेक ठिकाणी इथली भातशेती ही समपातळी टप्प्यांवर (टेरेसेस) असलेली दिसते. अनेक डोंगरांवर आपल्याला आंबा काजू बागा पाहायला मिळतात. अशा बागांमध्ये जमिनीच्या नैसर्गिक चढ-उतारामुळे येणारा वारा व सूर्यप्रकाश यामुळे फळे तयार होण्याचा कालावधी, फळवाढ, फळांचा रंग व उत्पादन यावर परिणाम होताना दिसतो.
फळप्रक्रिया उद्योगही कोकणात चांगल्याप्रकारे वाढलेला दिसून येतो. यामध्ये आंबा, काजू, कोकम, फणस, करवंद इत्यादी विविध फळांवर प्रक्रिया केली जाते. कोकणच्या कृषि प्रगतीमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे योगदान महत्वपूर्ण आहे आणि त्याचबरोबर इथल्या लोकांचे कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही महत्वाचे आहेत.
इथली जंगले मिश्र पानझडी प्रकारची आहेत. यामध्ये साग, शिवण यासारखे लाकूड उत्पादन देणारे वृक्ष तसेच कादंब, कळम, बहावा, काटेसावर, पांगारा, अंजनी, उंडी, भेंड, टेटू, समुद्रफळ, कुंभा, वरणा, सप्तपर्णी, केवस, हरडा, बेहेडा, बिब्बा असे अनेक उपयुक्त वृक्ष कोकणात पहायला मिळतात. याचबरोबर निगडी, धायटी, कुडा, अडुळसा, चित्रक, घाणेरी अशी अनेक झुडपे व गुळवेल, उक्षी, वाकेरीचा भाता, घोटवेल, विदारी, रानजाई अशा अनेक वेलीही आहेत.
इथल्या पावसाळी वनस्पतींमध्ये गुलाबी फुलांचा तेरडा, पांढऱ्या फुलांचे कस्थ, जांभळ्या फुलांची भारंगी, पिवळ्या फुलांच्या चिंचणी, टाकळा, कवळा इत्यादी अनेक वनस्पतींचा समावेश होतो.
या वैविध्यपूर्ण वनस्पतींमुळे त्यावर येणारे अनेक पक्षीदेखील बघायला मिळतात उदा. खंड्या, धीवर, हळद्या, कोतवाल, शिंपी, मोर, बुलबुल, सूर्यपक्षी, धनेश, घारींचे प्रकार, दयाळ, टिटवी इत्यादी. याशिवाय थंडीमध्ये समुद्रकिनारी सी-गल्सचे थवेही दिसतात. त्याचबरोबर फुलपाखरांच्या विविध प्रजातीदेखील येथे पाहायला मिळतात.
एकंदरीत काय तर इथली परिसंस्था खूपच समृद्ध आहे आणि निसर्गाचे हे वैविध्य हेच या प्रदेशचे वैशिष्ट्य आहे. हल्ली अनेकजण कोकणात शेतजमीन घेऊन शेती, फळबाग लागवड किंवा छोटंस शेतघर आणि कुटुंबापुरती फळे व भाजीपाला (परसबाग) लागवड करताना दिसतात. इथे जमीन घेतल्यावर त्या जमिनीवर असलेली वृक्षराजी सांभाळून उर्वरित मोकळ्या जागेत आंबा, काजू किंवा जमिनीच्या प्रकारानुसार सुयोग्य लागवड / वनशेतीही करता येऊ शकते. जमिनीचा उंचसखलपणा शास्त्रोक्त पद्धतीने उपयोगात आणल्यास जमिनीची धूपही कमी होईल. अशाप्रकारे इथली निसर्गसंपदा सांभाळून विचारपूर्वक कृती केल्यास होणारा विकास हा शाश्वत विकास असेल.