घराच्या मागे सुपारी आणि नारळाची बाग ही खूप लहानपणापासूनच बघितलेली आहे किंबहुना अनुभवलेली आहे. नारळ सुपारीच्या बागेला वाडी किंवा आगर असंही म्हटलं जातं आणि नारळाच्या झाडाला माड आणि सुपारीच्या झाडाला पोफळ असं म्हणतात.
माझ्या आंजर्ले या गावी काही भागात घरांची रचना एका रांगेत आहे. रस्त्याच्या दुतर्फा घरे आहेत आणि सामान्यपणे प्रत्येक घराच्या मागे वाडी आहे. जी घरे रस्त्याच्या पश्चिमेला आहेत तिथल्या वाड्या या घरापासून थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत आहेत (काही ठिकाणी दुसऱ्या वाड्यांपर्यंत आहेत) आणि रस्त्याच्या पूर्वेकडच्या घरांच्या मागील वाड्या या दुसऱ्या वाड्यांपर्यंत किंवा डोंगराच्या कड्यापर्यंत आहेत. त्यामुळे तुलनेने अरुंद आणि लांब चिंचोळा पट्टा असं या वाड्यांचे भौमितिक स्वरूप आहे. प्रत्येक घरामागील वाडी जरी वेगळी असली तरी फार कमी प्रमाणात अधोरेखित असलेल्या कुंपणाने ती वेगळी केलेली आहे. मात्र
तरीही वाडीत झाडाखाली पडलेला नारळ आपल्याच माडाचा आहे की शेजाऱ्याच्या माडाचा आहे हे नीट पाहून स्वतःच्या माडाचा नारळ असेल तरच मग तो घेतला जातो.
दाटीवाटीने लागवड केलेल्या वाड्यांमध्ये खरं सांगायचं तर नवख्या माणसाला नक्की कुठली वाडी कोणाची हे क्षणभर कळणार देखील नाही. पहावं तिकडे फक्त सुपारी – नारळ हेच दिसतं. वाड्यांच्या अशा रचनेमुळे वाडीतून समुद्र किनाऱ्यावर जाणं आणि सूर्यास्तानंतर समुद्र किनाऱ्यावरून परत त्याच वाडीतून आपल्याच घरी येणं हे बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी मोठं आव्हानच असायचं. कारण त्यावेळी प्रत्येक वाडीतून समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी वाट नसायची. त्यामुळे नक्की आपण आपल्या वाडीतून समुद्राच्या दिशेत पुढे पुढे आल्यावर किती पावले डावीकडे किंवा उजवीकडे जाऊन एका छोट्या वाटेवरुन समुद्र किनाऱ्यावर गेलो हे परत येताना अनेकांच्या लक्षात यायचं नाही.
बालपणी वाडीत खेळायला जाणे, आपल्या वाडीतील नारळाच्या झाडाखाली पडलेला नारळ उचलून घरी आणणे, पावसाळ्यानंतर साधारणपणे दिवाळीच्या मागे पुढे आगर उकरण्याचा कार्यक्रम – म्हणजे नारळाच्या झाडांना पाणी देण्यासाठी गोलाकार आळे (रिंग) तयार करणे आणि दोन-तीन झाडांच्या आळ्यांना एका छोट्या पाटाने (आमच्याकडे याला दांडा असं म्हटलं जातं) जोडून पाणी देण्याची पारंपरिक रचना करणे – त्यात यथाशक्ती मदत – मदत म्हणजे मातीत खेळण्याच्या निमित्तानेच सहभागी होणे, वाडीत शिपणं काढायला (वाडीतील झाडांना पाणी द्यायला जाणे) अशा अनेक कारणांनी नारळाच्या झाडांच्या आसपास किंवा झाडांखाली, वाडीमध्ये वावरणं झालं आहे. त्याशिवाय सवंगड्यांबरोबर लपंडाव,विटीदांडू, लगोरी, गोट्या, इतकंच नव्हे तर क्रिकेटही वाडीतच खेळायचो…… वाडीतील काही माड हे जणू स्थानसिद्ध फिल्डर म्हणून उभेच असायचे. या सर्व गोष्टींतून एक वेगळा आनंद मिळायचा.
तसं म्हटलं तर नारळ आणि सुपारी ही वाडीतील मुख्य पिकं. पण वाडीच्या दोन तृतीयांश किंवा अर्ध्या लांबी पर्यंत सुपारी, केळी आणि तुलनेने कमी संख्येने माड (नारळाचे झाड) आणि साधारणपणे समुद्राकडील अर्ध्या किंवा एक तृतीयांश भागांमध्ये वालुकामय मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुख्यत्वे नारळ लावलेले असतात. या वाड्यांमध्ये पिकांतील एका वेगळ्या प्रकारचं वैविध्यही पाहायला मिळतं. अशी वैविध्यपूर्ण झाडे विशेषतः घराजवळच्या भागात किंवा वाडीच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात लावलेली असतात. अशा या वाडीमध्ये नारळ, सुपारी आणि केळी याबरोबरच एक – दोन फणसाची झाडं…. त्यात परत एखादा कापा फणस, एखादा बरका फणस किंवा एखादा लवकर येणार तर एखादा त्यातील गऱ्यांच्या वेगळेपणामुळे जपलेला. एखादा कलमी आंबा किंवा रायवळ आंबा तर असतोच. त्याशिवाय २ – ३ रामफळाची झाडं, एखादा चिकू किंवा पपनसाचं झाड, आंतरपीक म्हणून सावलीमध्ये गारव्याला वाढणारी नारळ-सुपारीच्या खोडावर आधाराने वाढणारी काळीमिरी, मध्येच लावलेली २ – ३ जायफळाची झाडं अशी मसालापिकेही असतात.

वाडीच्या कडेच्या बाजूला डावीकडे किंवा उजवीकडे अननसाची झाडे लावलेली असतात. ही झाडे एका बाजूला लावण्याचा उद्देश म्हणजे अननसाच्या पानांना काटे असल्यामुळे शक्यतो आपल्याला बागेतील पिकांच्या मशागतीची आणि संवर्धनाची कामे करताना त्रास होऊ नये, पण अननस मात्र वर्षातून एकदा मिळावेत. काही वाड्यांमध्ये जांब, आवळा, पेरू, लिंबू यापैकी एखादं फळझाड लावलेलं असतं किंवा बी पडून आपोआप वाढलेलं पपईचं झाड. शिवाय शेवग्याची काही झाडंही असतात. 
त्याशिवाय कढीपत्ता, भाजीसाठी लागणारं अळू, मायाळू, काही घरांच्या मागे तोंडलीचा किंवा घेवडीचा मंडपही असायचा. शिवाय घराजवळच्या भागात विविध रंगाच्या जास्वंदी, पारिजातक, बिट्टी, सोनटक्का, कर्दळ, गुलबाक्षी, जाई-जुई, मोगरा, कणेर, तगर, गोकर्ण, रातराणी, मधुमालती अशी फुलं आणि शिवाय दुर्वा, तुळस अशा वनस्पतींचा या लागवडीत समावेश असायचा. कुंपणाला मेंदी, अडुळसा, कातरी जास्वंद यासारख्या वनस्पती लावून केलेलं सजीव कुंपण. (पावसाळ्यात एकमेकांकडे जास्वंद व इतर काही फुलझाडांच्या फांद्या लावून झाडे वाढवणे किंवा अशाच प्रकारे फांद्या लावून कुंपणाची डागडुजी हाही एक कार्यक्रम असायचा.)
शिवाय काही वाड्यांमध्ये एखादं बेलाचं झाड, एखाद्याच्या वाडीत नागचाफा किंवा एखादं बकुळ, सोनचाफा हेही त्यातच. समुद्रकिनारी भागात बाग संपते तिथे कुंपणाला लाटांपासून आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी केतकीची बनं, त्याशिवाय क्वचित एखादं सुरुचं झाड आणि कड्यावरील श्रीगणपतीच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर अशा काही निवडक उंचच उंच वाढलेल्या सुरुच्या झाडांच्या खुणेने आपली किंवा आजूबाजूची वाडी ओळखण्याचा प्रयत्न व्हायचा. सामान्यपणे भेंडीची आणि काही वाड्यांमध्ये उंडीची झाडेही असायची. पावसाळ्यात नारळाची चोडं (सोडणं) मातीच्या भांड्यात पेटवून त्यात एक दोन उंडीची फळे टाकून संध्याकाळच्या वेळी धूर (धुरी असं म्हणतात) केला जायचा…. डासांपासून संरक्षण ! प्रत्येक घरांमध्ये गाई गुरंही असायची. त्यामुळे एवढ्या सगळ्या वाडीतील झाडांना लागणाऱ्या शेणखताची सोयही व्हायची आणि दूध दुभतंही मिळायचं.
घराच्या जवळच्या भागामध्ये काही भाज्या लावायला थोडीशी जागा मोकळी ठेवलेली असते. घरासमोर असलेलं अंगण आणि मागील दारी असलेलं अंगण हे पावसाळ्यामध्ये वेलवर्गीय भाज्या आणि भेंडी अशा पिकांच्या लागवडीसाठी उपयोगात आणलं जायचं. थंडीत मेथी, मुळा आणि काही भाज्या लावल्या जायच्या. पूर्वी पाऊस गेल्यावर अंगण करणं, अधून-मधून नंतर ते सारवणं, घरासमोर मांडव घालणं आणि पावसाळ्यापूर्वी पुन्हा तो मांडव काढून सगळं सामान नीट करून ठेवणं अशी कामं असायची. मागील दारी विहिरीतून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हातपंप असायचा.
वर्षभरासाठी विविध प्रकारचा थोडासा भाजीपाला, काही फळे, फुले हे सर्व त्याच बागेतून मिळत असत. त्यामुळे आहारातही वैविध्य येत असे. ती बाग छान दिसण्यासाठी, बागेतली झाडं चांगली वाढण्यासाठी आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी वाडीतून चांगले उत्पन्न मिळावे या सर्व भावनेतून गावातला माणूस सातत्याने अपार कष्ट घेत असतो. गावातल्या लोकांना सुट्टी नसते. राहत असलेलं घर व घराचा परिसर याची देखभाल आणि वाडीतील कामांची यादी कधी संपतच नसे हे मी खूप जवळून पाहिलंय. आणि जवळून अनुभवलंय असं मी मुळीच म्हणणार नाही कारण तेवढे कष्ट मला करावे लागलेले नाहीत. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने गावातील प्रत्येकजण ही सर्व कामे नियमितपणे वर्षानुवर्षे करीत आहे.
आता तिथे अनेक बदल झालेले दिसतात. आज काही कारणांनी मी तेथे राहत नाही त्यामुळे पूर्वी असं असं होतं आणि आता तसं तसं झालं आहे अशाप्रकारचं विश्लेषण करणं फार सोपं आहे. परंतु विविध कारणांनी गावात हे बदल होत गेले हेही आपण समजून घेतलं पाहिजे. काही ठिकाणी आता या मांडवाची जागा कायम
स्वरूपाच्या पत्र्याच्या मांडवाने घेतली आहे आणि अंगणामध्ये काही ठिकाणी लाद्याही बसवलेल्या आहेत. उंचावर टाकीत पाणी साठवून घरात नळांद्वारे पाणी उपलब्ध झाले आहे, हातपंपांची संख्याही कमी झालेली आहे. नोकरी उद्योगासाठी कुटुंबातील व्यक्ती बाहेरगावी स्थायिक झाल्यामुळे आणि अन्य विविध कारणांमुळे काही घरे आता बंद झाली आहे. सजीव कुंपणाची जागा काही ठिकाणी चिरेबंदी भिंतीनं किंवा तारेच्या कुंपणाने घेतली आहे. वाडयांना पारंपारिक पद्धतीने पाणी देण्याची पद्धत बदलून काही वाड्यांमध्ये आता तुषार सिंचनासारख्या नवीन पद्धतींचा अवलंब केला जातोय.
आपण कितीही मोठे झालो, कुठेही राहिलो तरी बालपणीच्या आठवणी निश्चितच आपल्या मनात घर करून राहिलेल्या असतात. खरंतर आज असलेला ‘जागतिक नारळ दिवस’ हे हा लेख लिहिण्यासाठीचं एक निमित्त आहे. खरं सांगायचं ना तर २ जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे इथल्या वाड्यांची जी काही अवस्था झाली ती पाहणं आणि तिथे राहणाऱ्यांसाठी ती अनुभवून त्यातून बाहेर पडणं हे खरोखर एक मोठं आव्हान आहे. खरंतर वादळानंतरच्या तिथल्या परिस्थितीवर थोडंफार लेखन करावं असं मनात होतं. पण काही ना काही कारणांनी ते मागे पडलं. तरीही मन स्वस्थ बसू देत नव्हतं आणि या लेखनासाठी जागतिक नारळ दिन एक संधीच वाटली.
आंजर्ले येथील नारळ सुपारीच्या बागांचं पुढची काही वर्ष भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. पहिलं आव्हान होतं ते म्हणजे स्वतःच घर सावरणं, घरांची डागडुजी करणं; कारण …. अनेक घरांवरील कौले, कोने, पत्रे उडून गेले होते काही ठिकाणी तर घरावर झाड / झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. वीज पुरवठाही सुरळीत व्हायला जवळजवळ महिन्याभराचा कालावधी लागला. तिकडे संपर्क साधणंही अशक्य होतं कारण दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही बंद पडल्या होत्या. दुसरं मोठं आव्हान म्हणजे बागांची साफ-सफाई, पडलेली झाडे तोडून त्याचे ढीग करून ठेवणे, इत्यादी.
विविध माध्यमातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले…. सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, गावातून शहरांमध्ये गेलेले गावकरी, आंजर्ले आणि अशा किनारपट्टीवरील गावांमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने आलेले पर्यटकही, दापोली कृषी महाविद्यालयातून आणि दुसऱ्या महाविद्यालयांतून शिकून गेलेले विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने दापोली तालुक्यात वास्तव्य झालेल्या व्यक्ती, गावकऱ्यांचे मित्र आणि हितचिंतक, सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करणाऱ्या व्यक्ती तसेच शासन आणि प्रशासन. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचेही एक मोठे आव्हान या मदत कार्यामध्ये होतेच. नावाची आणि प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेबरोबर थोडंसं काम करायची संधी मला मिळाली होती आणि त्यानिमित्ताने खूपकाही शिकायला आणि अनुभवायला मिळालं.
विविध पातळ्यांवर ऑनलाइन मीटिंग, फोनवरून चर्चा, तिथल्या नियोजनाबद्दल काही कृती आराखडे, तिथे काय आंतरपिके लावता येतील, त्याशिवाय वाड्यांमध्ये पुन्हा कशी लागवड करायची, कुठली पिकं लावायची, यावरही विचारवनिमय व्हायला लागले. कृषी आधारित उद्योग, उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी, गटशेती यावरही विचार होऊ लागला. अशाप्रकारे संकटात किंवा अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्याचा दृष्टिकोन ठेवणार्या या सर्वच मंडळींच्या सकारात्मक विचारांना आणि प्रयत्नांना निश्चितच दाद दिली पाहिजे. पण प्रत्यक्ष गाव पातळीवर या गोष्टी सुरू करणे, तिथल्या लोकांना समजावून सांगणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन कृती आराखडा तयार करणे आणि ग्रामस्थांना त्यांच्याच सहभागातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करून काही वर्षांमध्ये तिथली आर्थिक घडी बसवणं हे खूप मोठं आव्हान आहे.
मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी जरी काही सकारात्मक विचार मांडले असले तरी अशा संकल्पना मांडणारे, नवीन नवीन गोष्टी सुचवणारे, समाज माध्यमातून पाहिलेली विविध उदाहरणे सांगणारे, सुरुवातीला मदत करणारे असंख्य लोक आहेत, असंख्य हात आहेत. परंतु प्रत्यक्ष तिथे राहून काम करणाऱ्यांची संख्या (गावात राहून पुन्हा बागेत लागवड करणारे म्हणजेच प्रत्यक्ष मातीत हात घालून काम करणारे) मात्र मर्यादितच आहेत. म्हणजे आपल्या वाडीत पुन्हा कसली आणि कशी लागवड करायची, लागवडीनंतर नारळ सुपारी या मुख्य पिकांचे उत्पादन सुरु होईपर्यंत कुटुंबाचं आर्थिक गणित कसं सांभाळायचं, नवीन लागवडीसाठीच्या आर्थिक तरतुदीचं काय? हे आणि असे असंख्य प्रश्न तिथल्या लोकांसमोर आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचं आव्हान सर्वांसमोर आहेच. पण सुरक्षेची योग्य काळजी घेऊन शहरातील लोकांनी नियोजनबद्ध पद्धतीने एकमेकांजवळ विचारविनिमय करून गावी असलेल्या आपल्या आपल्या घराकडे, नातेवाईकांकडे लक्ष देण्यासाठी, मदतीसाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी पुढील काही वर्ष वर्षातून ४ – ६ वेळा गावाकडे किंवा गावी येऊन काही करता येईल का? यावर अवश्य विचार करावा.
या वर्षी वादळ झालं आणि त्यानंतर वर म्हटल्या प्रमाणे मदतही आली. पण मला एक प्रश्न पडलाय आणि त्याच उत्तर मिळत नाहीये. २०२१, २०२२, २०२३ ……..२०३० पर्यंतच्या जून महिन्यातली परिस्थिती कशी असेल? त्या त्या वर्षी गणेशोत्सव कसा साजरा होईल? दिवाळीचा सण कसा साजरा केला जाईल? मुलांच्या शिक्षणाचं काय होईल? २०२५ साली गावातील कुटुंबांची आर्थिक आणि मानसिक स्थिती कशी असेल? तिथल्या शेतीवाडीची, छोट्या छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची,पर्यटन व्यवसायाची स्थिती कशी असेल? त्यामळे पुढील किमान १० वर्षांच्या दीर्घकालीन नियोजनाची, आर्थिक पाठबळाची आणि त्याच्या प्रभावी आणि निस्वार्थीपणे अंमलबजावणीची गरज आहे का? की वादळानंतर आतापर्यंत झालेले मदतकार्य पुरेसे आहे का? पण मी मात्र ठरवलंय की महिन्यातून किमान २ वेळा तरी आंजर्ल्याला जायचं आणि यथामती, यथाशक्ती शेतीवाडीसाठी मार्गदर्शन करायचं.
त्यामुळे कृती आराखडा ठरवताना वाड्यांमधील लागवड, आंतरपिके त्याचे नियोजन, डोंगरावरील आंबा काजूच्या बागांमधील लागवड यावर नियोजन आणि आर्थिक पाठबळासह मार्गदर्शन आवश्यक आहे. पुढील ५ – १० वर्षांचा कृती आराखडा यासाठीही विविध प्रकारच्या मदतीची आणि नियोजनाची आवश्यकता आहे. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही पुढील काही वर्ष अपेक्षित आहे. आर्थिक मदती बरोबरच
तिथल्या लोकांना मानसिक आधार देण्याचीही गरज आहे. गावकऱ्यांच्या कुटुंबातील शहरात असलेल्या नातेवाईकांनाही त्यांना आतापर्यंत यथाशक्ती मदत केली असेलच. वादळामुळे ज्यांच्या शेतीवाडीचं, स्थानिक उद्योगांचं, पर्यटन व्यवसायिकांचं नुकसान झालंय त्यांना केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या विविध योजना, सामाजिक संस्थांचा सहभाग, उद्योगांची सामाजिक बांधिलकी, कृषी व कृषिविषयक तज्ज्ञांचं नियोजन आणि मार्गदर्शन या सर्वांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याची आणि तो कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील किनापट्टीवरील आंजर्ल्यासारख्या अनेक गावांचे निसर्ग चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये ‘जागतिक नारळ दिवस’ खऱ्या अर्थाने साजरा होण्यासाठी अजून काही वर्षांचा कालावधी जावा लागेल.
Like this:
Like Loading...
Related